गडचिरोलीत सरकारविरोधात युवकांचा आक्रोश : जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ ऐतिहासिक धरणे आंदोलन

- नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी नारेबाजीने शहर दुमदूमला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दिल्ली येथील जंतर-मंतरवर सोनम वांगचूक व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या कथित तानाशाही प्रवृत्तीच्या निषेधार्थ आज गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेले एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. जिल्ह्यातील हजारो युवक-युवती, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक-राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारविरोधातील तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. त्यानंतर विविध वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, NEET पेपरफुटी, बेरोजगारी, लोकशाहीवरील संकट आणि युवकांच्या भवितव्याबाबत सरकारवर जोरदार टीका केली. अनेक युवकांनी आपल्या भाषणातून सरकारविषयीचा रोष आणि भावना व्यक्त केल्या.
यावेळी युवकांचा उत्साह एवढा उसळला की काही वेळ आयोजकांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. शहरातील मुख्य चौकात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. दरम्यान, पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले.
आंदोलनादरम्यान पावसाने अचानक हजेरी लावली. मात्र, मुसळधार पावसाची पर्वा न करता युवकांनी आंदोलन सुरूच ठेवत घोषणाबाजी आणि निषेध कायम ठेवला. या जिद्दीमुळे आंदोलनाला अधिकच भावनिक आणि संघर्षशील स्वरूप प्राप्त झाले. यावेळी NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या २१ युवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनात युवक-युवतींसह पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा, मागण्या आणि संताप फलकांवर लिहून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.या आंदोलनाचे आयोजन विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, आजाद समाज पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद, सत्यशोधक शिक्षक सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
आंदोलनस्थळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळू टेम्भूर्णे, भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद खान, ओबीसी युवा संघटनेच्या संतोषी सूत्रपवार, काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल होळी, जंगोरायताड आदिवासी संघटना, महिला मैत्री संघ आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला व आपले मनोगत व्यक्त केले.
आंदोलनाचे प्रास्ताविक आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले. त्यांनी शिक्षणातील पारदर्शकता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि युवकांच्या भविष्याच्या प्रश्नांवर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ओबीसी युवा संघटनेच्या संतोषी सूत्रपवार यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. एकूणच, गडचिरोलीतील हे आंदोलन युवकांच्या प्रचंड सहभागामुळे आणि जोरदार घोषणाबाजीमुळे जिल्ह्यातील अलीकडील काळातील लक्षवेधी आंदोलनांपैकी एक ठरले. सरकारविरोधातील युवकांचा रोष आणि आक्रोश या आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला.
आंदोलनास विवेक खोब्रागडे, कोवे, अमोल मारकवार, जीं के बारसिंगे, शीतल नरवडे, सोनाशी लभाने, ईश्वरी काळे, डॉ शिल्पा आठवले, प्रा. अनिल होळी, डॉ. प्रशांत सातार, प्रतीक डांगे, संतोषी सूत्रपवार, सतीश कुसराम, प्रितेश अंबादे, गणेश वरखडे, दिवाकर साखरे, नागसेन खोब्रागडे, डॉ. उज्वला सहारे, प्रकाश बन्सोड, नितीन वेस्कडे, विश्वरत्न युथ फॉउंडेशन चे वृषभ रामटेके, साहिल बोदेले, प्रतीक खोब्रागडे, मोनल सहारे, रणजित सर, प्रियांक काळे, यश गलगट, आदिनाथ जाधव आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




