महत्वाच्या बातम्या

 चांदापुरात वाघाच्या हल्ल्यात बैल ठार : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मूल : मूल तालुक्यातील चांदापूर गावात शुक्रवारी १७ मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास वाघाने गोठ्यातील बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदापूर येथील शेतकरी आनंदराव तिवाडे यांच्या गोठ्यात बैल बांधलेला होता. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक गोठ्यात घुसून बैलावर हल्ला चढविला. हल्ल्यानंतर वाघाने बैलाला तब्बल ३० मीटर अंतरापर्यंत ओढत नेण्याचा प्रयत्न केला. या भीषण हल्ल्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच पुढील तपास व आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

चांदापूर परिसरातील डोंगराळ भागात सध्या वाघाचा वावर वाढल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे, अत्यावश्यक असल्यास टॉर्च व काठी सोबत ठेवावी, तसेच एकट्याने फिरू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.

सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे वेगाने सुरू असल्याने शेतकऱ्यांना पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला असून भविष्यात आणखी हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, वन विभागाने या परिसरात तातडीने गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या तसेच पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos