पावसाने पाठ फिरवली : बावनथडी धरणातील पाणीसाठ्यात फक्त एक फूट वाढ


- पाणी साठ्याची संथ वाढ : धरण उन्हाळ्यासारख्याच स्थितीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पावसाळ्याला दीड महिना उलटून गेला असला तरी तुमसर तालुक्यातील राजीव सागर (बावनथडी) धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. धरणातील जलपातळीत आतापर्यंत केवळ एक फूट वाढ झाली असून, धरणाची स्थिती अजूनही उन्हाळ्यासारखीच आहे. धरण परिसरासह संपूर्ण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने जलसाठा वाढीचा वेग अत्यंत मंदावला आहे. परिणामी, शेतकरी, नागरिक तसेच सिंचन विभागाची चिंता वाढली आहे.
११ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या नोंदीनुसार धरणाची पूर्ण जलपातळी ३४४.४० मीटर असून सध्याची जलपातळी ३३६.९० मीटर इतकी आहे. धरणात सध्या केवळ १५.९१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत धरणाच्या पाणीपातळीत फक्त एक फूट वाढ झाल्याने यंदाचा पावसाळा अपेक्षेप्रमाणे ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सामान्यतः जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत असते. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यातील स्थितीपासून फारसा सुधारलेला नाही. पाणलोट क्षेत्रात अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असला तरी मुसळधार पावसाअभावी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे.
बावनथडी धरणावर तुमसरसह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा मोठा भार आहे. खरीप हंगामातील भात लागवड आणि इतर पिकांसाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असताना धरणातील कमी जलसाठ्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर सिंचन व्यवस्थेवर तसेच भविष्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा बावनथडी धरणातील जलसाठ्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठळक मुद्दे -
पावसाळ्यातही धरणातील जलपातळीत केवळ एक फूट वाढ.
धरणात सध्या १५.९१ टक्के उपयुक्त जलसाठा.
पूर्ण जलपातळी ३४४.४० मीटर, सध्याची जलपातळी ३३६.९० मीटर.
दमदार पावसाअभावी जलसाठा वाढीचा वेग अत्यंत मंद.
शेतकरी, नागरिक आणि सिंचन विभागाची चिंता वाढली.
News - Bhandara




Petrol Price




