महत्वाच्या बातम्या

 आगामी निवडणुकांसाठी बूथनिहाय नियोजनावर भर : हर्षवर्धन बाबा आत्राम यांचे प्रतिपादन


- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटची तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने बूथनिहाय नियोजन करून मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवावा. बूथस्तरावरील संघटना जितकी मजबूत असेल, तितकाच पक्षाचा विजय अधिक भक्कम होईल. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम बूथ लेव्हल एजंट नियुक्त करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली येथे तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस डॉ. मिताली आत्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करणे, बूथ समित्या सशक्त करणे, मतदार यादी अद्ययावत ठेवणे, सदस्य नोंदणी, जनसंपर्क वाढविणे तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन करण्यात आले. बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

डॉ.मिताली आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांचा व युवकांचा पक्ष संघटनेतील सहभाग वाढविण्यावर भर देत तळागाळातील प्रत्येक गावात संघटना अधिक सक्षम करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

बैठकीस एटापल्ली तालुकाध्यक्ष संभाजी हिचामी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजू चरडुके, महिला तालुकाध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, अनिल करमरकर, जनू नल्लावार, रैजु गावडे, दामा नरोटे, बबिता मडावी, लक्ष्मण नरोटे, सपना कोडापे, नामदेव लेकामी, पेका लेकामी, निर्मला हिचामी, छाया उईके, सरिता गावडे, दसरू मट्टामी, गिरीश नरोटे, अजय पदा, रामजी तेलामी, संतोष पदा, रामजी कत्तीवार, सुगध उराडे यांच्यासह माजी सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम बूथ लेव्हल एजंट नियुक्त करून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अधिक जोमाने मैदानात उतरेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos