महत्वाच्या बातम्या

 सुगंधित तंबाखूचा ८६ हजारांचा साठा जप्त


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित हुक्का शीशा व सुगंधित तंबाखूची छुप्या पद्धतीने विक्री व साठा करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी संयुक्त धडक कारवाई केली. शहरातील तेली मोहल्ला व नेहरू वॉर्ड परिसरात टाकलेल्या छाप्यात ८६ हजार ११० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आणून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासह संयुक्त छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी विकेश बैरागडे याच्याविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात विविध कडक कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक भास्कर ठाकरे, पोलीस कर्मचारी आखम, वीरा उईके, अपर्णा कालिया, तुषार खोब्रागडे, विलास नर्मलवार, राजू कळंबे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी चिन्मय मानसिंग कंजाम यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून तंबाखू माफियांचे धाबे दणाणले आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos