भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे, तो अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती ही संपूर्ण अभ्यासक्रमाकरीता लागु करण्यात येत असते. त्यामुळे शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्याने कोणताही अभ्यासक्रम अर्धवट सोडू नये. याबाबत विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन समाजकल्याण कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
अनेक विद्यार्थी १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी किंवा कृषी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न करतात. मात्र, प्रवेश प्रक्रियेत अपेक्षित जागा न मिळाल्यास किंवा गॅप टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बीए, बीएससी किंवा बीकॉम सारख्या बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. याच काळात विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि त्यांना लाभही मिळतो.
परंतु, पुढील शैक्षणिक वर्षात जेव्हा या विद्यार्थ्यांची निवड प्रत्यक्ष हव्या असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (उदा. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक) होते, तेव्हा तांत्रिक नियमांमुळे त्यांना त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळणे कठीण होते. नियमानुसार, एकदा शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, नवीन प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरतो.
शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असते. एकदा ही रक्कम जमा झाल्यानंतर, ती पुन्हा शासनाला चलनाद्वारे परत करण्यासाठी कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत. परिणामी, एकदा चूक झाल्यास विद्यार्थ्यांला शिष्यवृत्तीचा लाभ कायमचा गमवावा लागतो, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
महाविद्यालयांना समुपदेशनाच्या सूचना : शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान रोखण्यासाठी, यंदाच्या वर्षात बीए, बीकॉम, बीएससीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्या वेळीच योग्य समुपदेशन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरून विद्यार्थी अनावधानाने अशा अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज भरणार नाहीत.
जर विद्यार्थी भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणार असेल आणि सध्या केवळ बॅकअप म्हणून बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल, तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापूर्वी महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागाशी सविस्तर चर्चा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




