महत्वाच्या बातम्या

 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त बल्लारपूरात उद्या कार्यशाळेचे आयोजन


 कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीला प्राधान्य

विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पंचायत समिती बल्लारपूर यांच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ११ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती व लोकसंख्या स्थिरीकरणासाठी विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आधुनिक अल्पकालीन व दीर्घकालीन पुनर्वापरयोग्य गर्भनिरोधक साधने, कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धती, आपत्कालीन गर्भनिरोधक सेवा तसेच उपलब्ध कुटुंब नियोजन साधनांबाबत योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या अनुषंगाने शनिवार ११ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता राजे खांडक्या बल्हाळशाह सभागृह, पंचायत समिती बल्लारपूर येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यशाळा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कुटुंब नियोजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसंख्या स्थिरीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच, प्रशासक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सहाय्यक स्त्री व पुरुष आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक उपस्थित राहणार असून, आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा साळवे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos