महत्वाच्या बातम्या

 भामरागड पोलिसांच्या पुढाकाराने भव्य कृषी मेळावा : शेतकऱ्यांना शासकीय योजनांसह कृषी साहित्याचे मोफत वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रातील विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भामरागड पोलिसांच्या पुढाकारातून पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत बुधवारी ८ जुलै भामरागड पोलीस ठाण्याच्या पटांगणात भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला तालुक्यातील सुमारे १७० ते १८० शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सत्यसाई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज तसेच अपर पोलीस अधीक्षक, प्राणहिता अहेरी हर्षवर्धन यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली तथा तत्कालीन प्रभारी भामरागड राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सचिन शेवाळे, कृषी अधिकारी सोपान सोळुंखे, सहाय्यक कृषी अधिकारी विश्वजित शेळके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कदम, सहाय्यक कृषी अधिकारी वैभव ठाकरे, महिला व बालकल्याण विभागाच्या स्नेहल वेलके व एशू मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या भारती इष्टाम व शिला यमपलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस निरीक्षक सुरज इंगळे, महिला पोलीस उपनिरीक्षक विनया मराठे आणि भामरागड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मेळाव्यात उपस्थित तज्ज्ञांनी आपल्या-आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाण्यांचा वापर, रासायनिक व सेंद्रिय खतांचे संतुलित व्यवस्थापन, पीक उत्पादनवाढ, पशुपालन, महिला व बालकल्याण योजनांसह विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक सचिन शेवाळे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करत पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. पोलीस विभाग केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मेळाव्यानिमित्त भामरागड पोलीस ठाण्याच्या वतीने शेतकरी बांधवांना मोफत कृषी साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये २५ व १० किलो वजनाच्या एकूण २० बॅग धान बियाणे, २० प्लास्टिक घमेले, २० फावडे, १० विळे, ११० पावसाळी प्लास्टिक तसेच बेबी किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन पोलीस निरीक्षक सचिन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुरज इंगळे, महिला पोलीस उपनिरीक्षक विनया मराठे तसेच भामरागड पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कृषी मेळाव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयी जागरूकता वाढण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos