महत्वाच्या बातम्या

 तीन वर्षांनंतर बेपत्ता तरुणीचा शोध; हैदराबादमधून आरोपीसह ताब्यात : बल्लारपूर पोलिसांची कारवाई


विदर्भ चीज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तब्बल तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन असताना घरातून पळून गेलेल्या तरुणीचा बल्लारपूर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत यशस्वी शोध घेत हैदराबाद येथून तिला सुरक्षित ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी करण परशुराम टेकाम रा. आर्वी, ता. राजुरा याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित तरुणी एप्रिल २०२३ मध्ये अल्पवयीन असताना घरातून निघून गेली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून आली नव्हती.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला. तपासादरम्यान करण परशुराम टेकाम याने संबंधित मुलीला पळवून नेल्याची माहिती समोर आली.

तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हैदराबाद येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बल्लारपूर पोलिसांचे पथक हैदराबाद येथे रवाना झाले.

तेथे आरोपीचा माग काढून त्याला तसेच संबंधित तरुणीला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी तरुणीला सुरक्षितपणे बल्लारपूर येथे आणले. सध्या ती १८ वर्षे २ महिने वयाची असून नियमानुसार तिचा ताबा तिच्या मोठ्या आईकडे देण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस हवालदार संदीप दुर्योधन, महिला पोलीस अंमलदार शालिनी नैताम आणि रीना मेश्राम यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos