महत्वाच्या बातम्या

 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला बळ : तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिका


- कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ देत महसूल प्रशासनाने तत्परतेने आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण केले. अहेरी तहसील कार्यालयात तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते बुधवारी (८ जुलै) शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम ही एकेकाळी नक्षल चळवळीतील दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य म्हणून कार्यरत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तारक्का यांनी १ जानेवारी २०२५ रोजी, तर त्यांचे पती सोनू उर्फ भूपती यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला होता. 

शासनाच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शिधापत्रिका मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos