महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत दुर्दैवी घटना : गिझर दुरुस्ती करताना करंट लागून ३० वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात गिझर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून ३० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत युवकाचे नाव चिकू ऊर्फ अरविंद भोपये ३० वर्षे, मूळ रा. मुरमाळी असे आहे. अरविंद हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. विद्युत दुरुस्तीच्या कामाचा त्याला भक्कम अनुभव होता. कामातील कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मदतीचा स्वभाव यामुळे शहरात त्याची मोठ्या प्रमाणात ओळख होती. कोणत्याही कामासाठी शक्यतो नकार न देणारा आणि तत्परतेने सेवा देणारा युवक म्हणून तो परिचित होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अरविंद कामासाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर गडचिरोली शहरातील आशीर्वाद नगर परिसरात प्रदीप इंदूरकर यांच्या घरी गिझर दुरुस्तीसाठी तो गेला. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गिझर दुरुस्तीचे काम सुरू असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केल्याची माहिती मिळाली.

अवघ्या ३० वर्षांच्या वयात अरविंद भोपये यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार, सहकारी आणि परिचितांनी हळहळ व्यक्त केली. शहरातील अनेकांनी त्यांच्या मनमिळावू स्वभावाची आणि कामातील प्रामाणिकतेची आठवण काढत श्रद्धांजली अर्पण केली.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद भोपये यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांच्या मूळगावी मुरमाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos