महत्वाच्या बातम्या

 वन्यजीव संवर्धनासाठी ताडोबाचा अभिनव उपक्रम : २० वन्यजीव दूत तयार, ४,२७० विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणाचा लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी राबविलेल्या समुदाय निसर्ग शिक्षण कार्यक्रमाला मोठे यश मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत दहा अ‍ॅम्बेसेडर हायस्कूल्स मधून प्रत्येकी एक मुलगा व एक मुलगी अशा एकूण २० विद्यार्थ्यांची वन्यजीव दूत म्हणून निवड करण्यात आली असून, हे विद्यार्थी आपल्या शाळा आणि गावांमध्ये वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचविणार आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गानुभव व संवर्धन शिक्षण कार्यक्रम अंतर्गत वर्षभरात एकूण ४,२७० विद्यार्थ्यांनी जंगल सफारी, निसर्ग भ्रमण आणि विविध संवर्धन शिक्षण उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये बफर क्षेत्रातील १०६ शाळांमधील २,३९७ विद्यार्थी, तर बफर क्षेत्राबाहेरील तसेच वन्यजीव भ्रमणमार्ग (कॉरिडॉर) परिसरातील ५७ शाळांमधील १,८७३ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

बफर क्षेत्रातील सर्व शाळांपर्यंत निसर्ग शिक्षण पोहोचविण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) यांच्यात गतवर्षी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्याअंतर्गत बफर क्षेत्रातील ६७ शाळांमध्ये बीएनएचएस, तर ३९ शाळांमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यात आला. बीएनएचएसच्या उपक्रमाला ब्रिटनमधील बॉर्न फ्री फाउंडेशनचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना ताडोबा भेटीपूर्वीच जंगल, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनाची प्राथमिक माहिती मिळावी, यासाठी विविध टप्प्यांत उपक्रम राबविण्यात आले.

 दहा अ‍ॅम्बेसेडर हायस्कूल्समध्ये कार्यक्रमपूर्व ज्ञान चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ४४ उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जैवविविधता जागृती सत्रे, ३३ प्राथमिक शाळांमध्ये पोस्टरद्वारे जनजागृती, ४८ शाळांमध्ये शाश्वत वनसंपदा, वनसंवर्धन आणि मानव-वन्यजीव सहजीवनावरील दृकश्राव्य सादरीकरणे व शैक्षणिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

तसेच ४८ शाळांमध्ये निसर्गाधारित शैक्षणिक खेळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अन्नसाखळी, भक्षक-भक्ष्य संबंध आणि जैवविविधतेचे महत्त्व सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले.याशिवाय सर्व १०६ शाळांमध्ये ट्रुथ अबाऊट टायगर या शैक्षणिक चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटातून वाघांचे वर्तन, अधिवास, पर्यावरणीय भूमिका आणि संरक्षित जंगलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक पद्धतीने समजावून देण्यात आले.

कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर अ‍ॅम्बेसेडर हायस्कूल्समध्ये पुन्हा ज्ञान चाचणी घेण्यात आली. या मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि दृष्टिकोनात लक्षणीय बदल झाल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक वनस्पती आणि प्राणिजीवनाविषयीचे ज्ञान ३० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढले, तर जंगल आणि वन्यजीवांविषयी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३८ टक्क्यांवरून ६२ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निष्पन्न झाले.

या उपक्रमाची फलश्रुती म्हणून निवड करण्यात आलेले २० वन्यजीव दूत आता आपल्या शाळा, गाव आणि परिसरात वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव सहजीवनाबाबत जनजागृती करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावणार आहेत. भविष्यात स्थानिक समुदायाचा संवर्धनातील सहभाग वाढविण्यासाठी हे विद्यार्थी महत्त्वाचे माध्यम ठरणार असल्याचा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण निसर्ग भ्रमण आणि संवर्धन शिक्षण कार्यक्रम पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या शाळांपासून ताडोबापर्यंत ये-जा करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

हा कार्यक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला आणि बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. भारतीय वन सेवेचे अधिकारी कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी, विशाल माळी, तसेच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, बीएनएचएसचे शिक्षण अधिकारी सौरभ दांडे आणि शशांक लाडेकर, तसेच प्रफुल्ल सावरकर आणि राजेश्वरी दयालवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
         

याबाबत क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी सांगितले की, या कार्यक्रमातून तयार झालेले वन्यजीव दूत हे वन्यजीव संवर्धन आणि स्थानिक समुदाय यांच्यातील प्रभावी दुवा ठरतील. हे विद्यार्थी आपल्या परिसरात संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याबरोबरच इतरांनाही पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करतील. या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे येत्या वर्षात ‘ग्रेटर ताडोबा लँडस्केप’ परिसरातील अधिकाधिक गावांपर्यंत हा कार्यक्रम विस्तारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos