महावितरण या तारखेपासून बसवणार स्मार्ट प्रिपेड मीटर : रिचार्ज संपले की वीज बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Smart Prepaid Meter महावितरण कंपनी राज्यभरात लवकरच स्मार्ट प्रिपेड मीटर सर्वत्र बसवणार आहे. एकुण २.८१ कोटी ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलून हे मीटर लावण्यात येतील.
सर्वप्रथम शासकीय कार्यालये आणि वसाहतींमध्ये ते बसवले जातील. यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर ठिकाणी ते लावले जाईल. महावितरण १५ मार्च २०२४ पासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला सुरूवात करणार आहे.
राज्यात चार खासगी कंपन्यांना महावितरणने २ कोटी २४ लाख ६१ हजार ३४६ स्मार्ट प्रिपेड मीटरचे कंत्राट २६ हजार ९२३ कोटी ४६ लाखांमध्ये दिले आहे. मे. अदानीला भांडूप, कल्याण, कोंकण, बारामती, पुणे झोनमधील १३ हजार ८८८ कोटी ७३ लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे.
तसेच मे. एनसीसीला ६ हजार ७९१ कोटी ५५ लाख, मे. मॉन्टेकार्लो कंपनीकडे ३ हजार ६३५ कोटी ५३ लाख रुपयांचे, तर मे. जीनस कंपनीला २ हजार ६०७ कोटी ६१ लाख रुपयांचे कंत्राट दिले आले आहे.
स्मार्ट मीटरबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. यासाठी सर्वप्रथम हे मीटर शासकीय कार्यालये आणि शासकीय वसाहतींमध्ये लावण्याचे नियोजन आहे. त्यानंतर सर्व ग्राहकांकडे ते बसवण्यात येईल. स्मार्ट मीटर १५ मार्चपासून महावितरण लावणार होती, परंतु ही तारीख जवळ आली असल्याने नक्की सुरूवात कधी होणार याकडे ग्राहकांचे लक्ष आहे.
असे असेल स्मार्ट प्रिपेड मीटर -
- मोबाइलप्रमाणे ग्राहकांना विजेसाठी रिचार्ज करावे लागेल.
- किती वीज वापरली त्याची माहिती मोबाइल अॅपमध्ये पाहता येईल.
- वीजवापरासाठीचे पैसेही कुठूनही, कधीही भरता येतील.
- वीजवापर कमी-जास्त करता येईल.
- विजेचा वापर जसा वाढेल, तसे रिचार्जचे पैसे संपत जातील.
- प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल.
- वीजवापराची आणि किती पैसे उरले याची माहिती मोबाईलवर आधीच मिळेल आणि नव्याने पैसे भरणे सुलभ होईल.
- घरबसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पैसे भरता येतील.
- ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर वितरण कंपनीकडून मोबाइलवर एसएमएस येईल.
- मानवी हस्तक्षेप कमी होऊन ग्राहकांना अचूक देयक मिळेल.
- देयकाबाबतच्या तक्रारी कमी होतील.
News - Rajy