महत्वाच्या बातम्या

 रुग्णकेंद्रित वैद्यकीय नियमन कायदा मंजूर करावा : उदय धकाते यांची राज्य सरकारकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना (नियमन) विधेयक, २०२५ मधील त्रुटी दूर करून रुग्ण, ग्राहक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांच्या हिताचा समतोल राखणारा, पारदर्शक आणि प्रभावी कायदा मंजूर करावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उदय धकाते यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील खाजगी वैद्यकीय आस्थापनांचे नियमन, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण आणि आरोग्य सेवेतील पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले असले, तरी त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींचा अभाव आहे. त्यामुळे विधेयकात आवश्यक सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उदय धकाते यांनी रुग्णांच्या मूलभूत हक्कांना कायदेशीर संरक्षण देणे, उपचाराची संपूर्ण माहिती व संमतीचा अधिकार, बिलामध्ये पारदर्शकता आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा यांचा स्पष्ट समावेश करण्याची मागणी केली आहे. तसेच तक्रार निवारण समित्यांमध्ये ग्राहक प्रतिनिधी, रुग्ण प्रतिनिधी आणि स्वतंत्र कायदेतज्ज्ञांचा समावेश करून त्या पूर्णपणे निष्पक्ष व स्वायत्त असाव्यात, असेही त्यांनी सुचविले आहे.

वैद्यकीय सेवा शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य व जिल्हास्तरीय नियमन समित्या स्थापन करणे, सर्व रुग्णालयांनी दरपत्रक सार्वजनिकपणे प्रदर्शित करणे, आपत्कालीन परिस्थितीत उपचार नाकारणाऱ्या आस्थापनांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे, ग्रामीण भागातील दवाखान्यांसाठी ऑनलाइन नोंदणी व परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुलभ करणे, तसेच राज्याचा कायदा केंद्रीय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, २०१० शी सुसंगत ठेवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय स्वतंत्र वैद्यकीय आस्थापना नियामक प्राधिकरण स्थापन करणे, रुग्ण सुरक्षा व पारदर्शकता सनद जाहीर करणे, ग्राहक प्रतिनिधींना नियामक समित्यांमध्ये स्थान देणे, वैद्यकीय सेवा शुल्कासाठी मार्गदर्शक धोरण तयार करणे आणि रुग्णालयांमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये निष्पक्ष चौकशी समितीची तरतूद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने हे विधेयक अंतिम करताना रुग्ण, ग्राहक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या सूचना विचारात घेऊन सर्वसमावेशक, रुग्णकेंद्रित आणि पारदर्शक कायदा मंजूर करावा, अशी अपेक्षा उदय धकाते, सचिव अरुण पोगळे, उपाध्यक्ष विजय साळवे, विजय कोतपल्लीवार, डॉ. देवेंद्र मुनघाटे, सुचिता धकाते, प्रा. सुनीता साळवे, आशा कोकोडे आदींनी यांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos