महत्वाच्या बातम्या

 स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे दुग्धव्यवसायावर १२ दिवसांचे मोफत प्रशिक्षण : १८ जूनपासून सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या वतीने दुग्धव्यवसाय (Dairy Farming) विषयावर १२ दिवसांचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १८ जून २०२६ पासून सुरू होणार असून ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये दुग्धव्यवसायाशी संबंधित सर्व महत्त्वाचे तांत्रिक आणि व्यावसायिक पैलू शिकवले जाणार आहेत. यामध्ये अधिक दूध देणाऱ्या गायी-म्हशींच्या प्रगत जातींची ओळख, आधुनिक व हवेशीर गोठ्याची रचना तसेच दुधाळ जनावरांचे दैनंदिन व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल. जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चारा व आहार व्यवस्थापन, विविध ऋतूंनुसार संतुलित पशुखाद्य, सायलेज (मुरघास) तयार करणे तसेच आजारांचे निदान, प्रथमोपचार आणि वेळेवर लसीकरण याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षण देतील.

दुग्ध उत्पादनाबरोबरच व्यवसाय नफ्यात कसा चालवावा याचेही प्रशिक्षण या कार्यक्रमात दिले जाणार आहे. यामध्ये स्वच्छ दूध उत्पादन, दुधाची योग्य साठवणूक, बाजारपेठेचे सर्वेक्षण, खेळते भांडवल (Working Capital) व्यवस्थापन, नफा-तोटा पत्रक तयार करणे तसेच बँक कर्जासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल (Project Report) स्वतः तयार करण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दुग्धव्यवसायाला एक यशस्वी उद्योग म्हणून विकसित करण्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना जेवण, चहा, नाश्ता, वही, पुस्तके तसेच निवासाची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्वयंरोजगाराची आवड असलेले, व्यवसाय सुरू करण्याची तयारी असलेले १८ ते ५० वर्षे वयोगटातील, किमान दहावी उत्तीर्ण किंवा नापास उमेदवारांनी १८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बँक ऑफ इंडिया परिसर, लालबहादूर शास्त्री (मनरो) शाळेजवळ, शास्त्री चौक, भंडारा येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक मंगल निमजे यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos