महत्वाच्या बातम्या

 महापारेषणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडळीय क्रीडा स्पर्धांचा नागपुरात थरार : ७ जानेवारीला उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील अग्रणी शासकीय कंपनी महापारेषण तर्फे राज्यस्तरीय आंतर-परिमंडळीय क्रीडा स्पर्धा २०२५-२०२६ चे आयोजन ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत नागपूर येथे करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन ७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता काटोल रोड येथील पोलीस कवायत मैदानावर होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) उपस्थित राहणार आहेत. ध्यास सर्वोत्कृष्ट होण्याचा हे ब्रीद समोर ठेवून आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील सात परिमंडळ कार्यालये आणि मुंबई येथील सांघिक कार्यालय असे एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये राज्यभरातून अंदाजे १००० खेळाडू कर्मचारी आणि अधिकारी आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

या स्पर्धांच्या आयोजनामागे कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देणे, खेळाचा दर्जा वृद्धिंगत करणे आणि शारीरिक सुदृढतेच्या माध्यमातून कंपनीच्या प्रगतीत भर टाकणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा मैदानी आणि आंतरगृह (इनडोअर) अशा दोन्ही प्रकारात होतील. मैदानी स्पर्धांसाठी काटोल रोड येथील पोलीस कवायत मैदान, कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मैदान आणि नागपूर विद्यापीठाचे क्रीडांगण सज्ज करण्यात आले आहे. तर आंतरगृह स्पर्धा मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात पार पडतील.

नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश अणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणची चमू या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos