मुंबईत मुसळधार पावसाचा कहर : हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी, समुद्रात भरतीचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून दैनंदिन व्यवहारांवर गंभीर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.
सततचा मुसळधार पाऊस आणि ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
समुद्रात मोठ्या भरतीचा धोका -
रविवारी दुपारी ३.२२ वाजता समुद्रात ४.१९ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारी पहाटे ३.४१ वाजता ३.५१ मीटर उंचीची दुसरी मोठी भरती अपेक्षित आहे. या काळात मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका अधिक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आणि केवळ अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
२४ तासांत ३०० मिमीपर्यंत पावसाची नोंद -
गेल्या २४ तासांत मुंबईतील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी पश्चिम येथील बिल्डिंग प्रपोजल ऑफिस परिसरात सर्वाधिक ३१०.६ मिमी पाऊस झाला आहे. त्याशिवाय मलबार हिल, मांडवी फायर स्टेशन, मेमनवाडा, पवई, भांडुप कॉम्प्लेक्स, अंधेरी फायर स्टेशन, जोगेश्वरी आणि आरे कॉलनी या भागांतही २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या सततच्या पावसामुळे अनेक सखल वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
रेल्वे आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम -
कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या रुळांवर पाणी साचल्याने उशिराने धावत आहेत. दुसरीकडे, मेट्रो आणि बेस्ट बस सेवा सुरू असल्या तरी रस्त्यांवर पाणी साचणे आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परिणामी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
फ्लॅश फ्लड आणि दरडी कोसळण्याचा धोका -
हवामान विभागाने मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कमी ते मध्यम तीव्रतेच्या फ्लॅश फ्लड म्हणजेच अचानक पूर येण्याचा धोका वर्तवला आहे. तसेच डोंगराळ आणि घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
धरणांतील जलसाठ्यात वाढ -
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या एकूण पाणीसाठा १३.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून पुढील काही तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
News - Rajy




Petrol Price




