भामरागड पोलीसांची दारुबंदी पथकाची पुन्हा यशस्वी कारवाई : अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी लागू असतानाही भामरागड तालुक्यात काही व्यक्ती लपूनछपून अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक व विक्री करत असल्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच भामरागड पोलिसांच्या दारुबंदी पथकाने सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दारू विक्रेते अवैध देशी दारूची वाहतूक करून ती आरेवाडा रोड परिसरातील नाल्यांच्या खाली लपवत असल्याचे समोर आले होते. ही माहिती पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन शेवाळे यांना मिळताच त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
यानंतर भामरागड पोलीस स्टेशनच्या पथकाने भामरागड शहर परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तारा सनातन बाला (वय ३४), केये मुरा उसेंडी (वय ४५) आणि करण वेलादी (वय ३५), सर्व रा. भामरागड अशी आहेत.
पथकाने त्यांच्या ताब्यातून देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या एकूण २६३० बाटल्या जप्त केल्या. या जप्त मालाची एकूण किंमत अंदाजे ₹२,६३,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई दरम्यान आरोपी अवैधरीत्या दारूची वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन शेवाळे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये पोउपनि. दत्तात्रय उजे, पोहवा. जयंत पुढो, आकाश ऊईके, प्रफुल्ल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार राहुल पारेलीवार, अवनित गव्हारे, विक्रांत शेन्डे, अनिल चप्पीडी आणि महिला पोलीस अंमलदार गणेश्री ईटकलवार यांनी सहभाग घेतला.
भामरागड पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




