महापौरांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे सफाई कुली व सफाई रेजा पदावर नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी २२ जूनपासून सुरू असलेले बेमुदत संप व आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले. महापौरांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर संगीता खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात उपोषणकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला आ. सुधाकर अडबाले, आयुक्त अकुनुरी नरेश, सभा गृह नेत्या जयश्री जुमडे, उपायुक्त शेषराव टाले तसेच नगर सेवक पप्पू देशमुख, सुनिल खंडेलवाल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच या विषयावर शासनाकडून आवश्यक मार्गदर्शन तातडीने मागवून त्यानुसार कोणताही विलंब न करता पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.
महापौरांनी उपोषणकर्त्यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नसल्याची ग्वाही देत शासनाच्या नियमांनुसार न्याय्य निर्णयासाठी महानगरपालिका प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल, असे स्पष्ट केले. या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत उपोषणकर्त्यांनी २२ जूनपासून सुरू असलेले बेमुदत संप व आमरण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.
यावेळी उपोषणकर्त्यांनी महापौर, उपस्थित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले. शासनाकडून आवश्यक मार्गदर्शन प्राप्त होताच पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
News - Chandrapur




Petrol Price




