गडचिरोली जिल्ह्यात विजेचा कडाका : दोन तरुण मजुरांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात विजेचा धक्का लागून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २१ जून रोजी समोर आली आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा येथे १८ वर्षीय मजुराचा हायव्होल्टेज तारेचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला, तर अहेरी तालुक्यातील बोरी येथे विद्युत खांबावर काम करताना लागलेल्या धक्क्यामुळे एका २० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. आरमोरी तालुक्यातील पहिली घटना २१ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
मोरेश्वर गुलाब लाकडे (वय १८, रा. वडधा) हा तरुण मजूर बोडधा येथे एका घराचे स्लॅब टाकण्याचे काम करत होता. छतावर लोखंडी सळ्या खाली देत असताना, बाजूने गेलेल्या हायव्होल्टेज विजेच्या तारांना सळीचा अचानक स्पर्श झाला.
विजेचा तीव्र धक्का लागल्याने मोरेश्वर छतावरच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना अहेरी तालुक्यातील बोरी येथे घडली असून, येथील समीर मस्तान शेख (२०) या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
समीर हा १८ जून रोजी सकाळच्या सुमारास गावातील विद्युत खांबावर वीज जोडण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार शॉक लागला आणि तो खांबावरून थेट खाली कोसळला. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर २० जून रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. या दोन्ही दुर्घटनांमुळे वडधा आणि बोरी गावांवर शोककळा पसरली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




