गडचिरोली - आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा निघाली, लवकरच कामाला सुरुवात होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील प्रमुख आणि वर्दळीचा मार्ग असलेल्या  गडचिरोली - आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा काढण्यात आली असून या महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
केंद्र शासनाने गडचिरोली शहरातून चारही मार्गाने जाणाऱ्या राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. त्यातील चंद्रपूर ते धानोरा तालुक्यातील मुरूमगावपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामापैकी मूल ते गडचिरोली पर्यंतच्या कामाचे कंत्राट काढून कामाला सुरूवात झाली आहे. तसेच ब्रह्मपुरी-आरमोरी मार्ग सुध्दा बांधला जात आहे. गडचिरोली ते आष्टी या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला होता. या मार्गाचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणने या कामाची निविदा काढली आहे. २१ ऑगस्टपर्यंत निविदा मागविण्यात आल्या असून २३ ऑगस्ट रोजी उघडल्या जाणार आहेत. निविदा उघडल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन लवकरच कामाला सुरूवात होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांनी दिली आहे. 
गडचिरोली-आष्टी महामार्गाचे नव्याने बांधकाम केले जाणार असल्याने या महामार्गाची मागील एक वर्षापासून डागडुजी केली नाही. त्यामुळे या महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की खड्डा चुकविणे अशक्य झाले आहे. महामार्गाचे पूर्ण बांधकाम होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सद्य:स्थितीत असलेल्या डांबरी रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास वाहनधारक व प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-18


Related Photos