महत्वाच्या बातम्या

 डॉ. ईशा पठाण यांचा पंचायत समिती बल्लारपूरकडून सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र, कळमना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा पठाण यांच्या समर्पित व सेवाभावी वैद्यकीय कार्याचा पंचायत समिती बल्लारपूरकडून सन्मान करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या हस्ते डॉ. पठाण यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.


बल्लारपूर तालुक्यातील गोरगरीब, दीन-दुबळे व गरजू रुग्णांना वेळेची पर्वा न करता वैद्यकीय सेवा देत त्यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. रुग्णांवर उपचार करण्यासोबतच त्यांना मानसिक आधार देत माणुसकीची जपणूक करणाऱ्या त्यांच्या कार्याची सन्मानपत्रातून विशेष दखल घेण्यात आली.


वैद्यकीय सेवा हा केवळ व्यवसाय नसून मानवी वेदनांवर उपचार करणारे सेवाव्रत असल्याचे नमूद करत, डॉ. पठाण यांनी ज्ञान, कौशल्य, परिश्रम आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून रुग्णसेवा केली असल्याचे पंचायत समितीने गौरवपत्रात म्हटले आहे. रात्री-अपरात्रीही रुग्णांच्या मदतीला धावून जात त्यांना आवश्यक उपचार व आधार देण्याचे कार्य त्यांनी केले.
   

त्यांच्या निस्वार्थ आणि समर्पित आरोग्यसेवेचा गौरव म्हणून पंचायत समिती बल्लारपूरकडून हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. ईशा पठाण यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना निरोगी, सुदृढ व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





  Print






Related Photos