महत्वाच्या बातम्या

 कोहळी समाजाचा भव्य मेळावा २९ जून रोजी साकोली येथे : न्याय हक्कांसाठी एकजुटीचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : कोहळी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यासाठी तसेच समाजाची संघटित शक्ती एकवटण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोहळी समाज विकास मंडळ आणि कोहळी पाटील संघर्ष मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कोहळी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम समाज नंतर पक्ष या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मेळाव्यास समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा मेळावा सोमवार, २९ जून २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता मंगलमूर्ती सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ तसेच चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघ यांसह साकोली विधानसभा मतदारसंघ, तुमसर विधानसभा मतदारसंघ, अर्जुनी (मोर) विधानसभा मतदारसंघ, चिमूर विधानसभा मतदारसंघ, ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ आणि आरमोरी विधानसभा मतदारसंघ येथील कोहळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आयोजकांच्या माहितीनुसार, समाजातील आबालवृद्ध, युवक, महिला व पुरुष यांना एकत्र आणून समाजाची एकजूट अधिक मजबूत करणे, समाजाच्या न्याय हक्कांविषयी जनजागृती करणे, तसेच समाजाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी पुढील दिशा निश्चित करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी संघटन, एकता आणि समाजहिताच्या विविध विषयांवर सखोल चर्चा होणार असून भविष्यातील संघटनात्मक वाटचालीचा आराखडाही तयार केला जाणार आहे.

या प्रसंगी भीक नको, हक्क हवा – कोहळी समाजाचा एकच दावा आणि कोहळी पाटील जागे व्हा – एकता, संघटन, विकास अशा घोषणांनी परिसर दुमदुमणार आहे. समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या हक्क, अस्मिता आणि विकासाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही आयोजकांकडून देण्यात आली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos