बामणपेठजवळ महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला : पतीविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : तालुक्यातील बामणपेठ गावाजवळील जंगल रस्त्यावर २८ वर्षीय विवाहितेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना रविवारी (२८ जून) सकाळी घडली. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका ब्रजकेश दास ऊर्फ कनिका विश्वजीत मंडल (२८) यांना त्यांचे आतेभाऊ हरिदास अमल गाईन (रा. लगाम, ता. मूलचेरा) हे त्यांच्या दोन भाच्यांसह दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी जात होते.
सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बामणपेठ गावाजवळील जंगल रस्त्यावर आरोपी ब्रजकेश ठाकूर दास (३४, रा. विकासपल्ली, ता. चामोर्शी) याने दुचाकीला पाठीमागून पायाने धक्का दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कनिका यांच्यावर धारदार शस्त्राने पोट, मान, दोन्ही हात व दोन्ही पायावर वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात कनिका या गंभीर जखमी झाल्या.
हरिदास अमल गाईन यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१), २९६ व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार जमिल कदीर शेख यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन मुकुंदराव मस्के करीत आहेत. या प्रकरणावर प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल प्रकाशराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




