प्रेमप्रकरणाच्या वादातून वृद्धावर घरात घुसून मारहाण : तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : जुन्या प्रेमप्रकरणाच्या वादातून एका ७१ वर्षीय वृद्धाला घरात घुसून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बल्लारपूर शहरातील विवेकानंद वार्ड परिसरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी नथ्यु धौडु शेरकी (७१), रा. झांसी राणी चौक, विवेकानंद वार्ड क्र. १०, बल्लारपूर हे सेवानिवृत्त कर्मचारी असून कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलगा भुपेंद्र शेरकी याने काही वर्षांपूर्वी रवि ठाकूर यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंधातून मंदिरात विवाह केला होता. त्यानंतर संबंधित तरुणीने भुपेंद्रविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला होता.
फिर्यादीनुसार, १६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास मधु ठाकूर या त्यांच्या घराजवळ आल्या व मुलगा भुपेंद्र हा आपली बदनामी करीत असल्याचा आरोप केला.
त्यानंतर सायंकाळी सुमारे ६.३० वाजता मधु ठाकूर, गुणगुन ठाकूर आणि सोनी ठाकूर या तिघी शेरकी यांच्या घरात आल्या. त्यांनी भुपेंद्र याचा शोध घेत शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, भुपेंद्र घरातून निघून गेला. त्यानंतर तिन्ही महिलांनी नथ्यु शेरकी यांना ढकलाढकली करत हाताबुक्यांनी मारहाण केल्याचा तसेच तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी मधु रवि ठाकूर, गुणगुन ठाकूर व सोनी ठाकूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(३), ३५२, ११५(२), ३३३ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदेश वाघमारे करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




