महत्वाच्या बातम्या

 TET पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. मात्र, या परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात सातत्याने स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांमुळे गुणवंत आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शासनाकडे TET पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, प्रामाणिक विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, भविष्यात परीक्षा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता, सुरक्षितता व विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच पेपरफुटी किंवा तत्सम परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी परीक्षा व्यवस्था व स्पष्ट धोरण निश्चित करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा संयोजक विकास बोदलकर, गडचिरोली नगर मंत्री संकेत मस्के, आरमोरी नगर मंत्री चेतन भुसारी, जिल्हा समिती सदस्य गौरव भोयर, गडचिरोली नगर विस्तारक सुमितजी बरांडे, तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शासनाने या प्रकरणात तातडीने कठोर व पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos