२२ वर्षांच्या अथक संघर्षाचे फलित असलेल्या कारगिल स्मारकात २७ वा कारगिल विजय दिवस उत्साहात


- संस्थापक उदय धकाते यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव; शहीद जवानांच्या शौर्याला अभिवादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी गडचिरोली शहरातील कारगिल स्मारक परिसरात २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जिल्हाभरातील माजी सैनिक, वीरपरिवार, विद्यार्थी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांच्या २२ वर्षांच्या अथक संघर्षाचा गौरव. गडचिरोली शहरात कारगिल स्मारक उभारण्याच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष स्मारक उभारणीपर्यंत त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची आणि संघर्षाची सर्व वक्त्यांनी विशेष दखल घेतली. सन २००० पासून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा, पायपीट आणि प्रयत्न करत अखेर २०२२ मध्ये हे कारगिल स्मारक साकार झाले. आज हे स्मारक जिल्ह्यातील देशभक्तीचे प्रेरणास्थान बनले असून, शहीद जवानांच्या स्मृती कायम जतन करणारे राष्ट्रीय स्मृतिस्थळ ठरल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य कारगिल विजय रॅलीने झाली. रॅलीत शालेय विद्यार्थी, युवक, नागरिक तसेच गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहभागी झाले. तिरंगा हाती घेत देशभक्तीपर घोषणा देत निघालेली ही रॅली कारगिल चौकातील शहीद स्मारकावर पोहोचली. तेथे मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण मानवंदना दिली.
त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या त्यागाला सलाम केला.
कारगिल स्मारक हे प्रेरणेचे राष्ट्रीय स्मृतिस्थळ -
कार्यक्रमात आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णा रेड्डी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, वीरपत्नी चंदनखेडे, व्यापारी संघटनेचे घिसूलाल काब्रा, होमराज डोनाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व वक्त्यांनी आपल्या मनोगतात उदय धकाते यांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, कारगिल स्मारक हे केवळ एक स्मारक नसून शहीद जवानांच्या शौर्याची प्रेरणा देणारे राष्ट्रीय स्मृतिस्थळ आहे. गेली अनेक वर्षे उदय धकाते देशभक्तीची भावना जपण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, मोबीन सय्यद, सुचिता धकाते, वनिता भांडेकर, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, वैभव रामटेके, राजू डोंगरे, सुचिता कामडी, प्रा. सुनीता साळवे, वनिता धकाते, स्मिता दुधे, प्रमिला कुंभारे, प्रा. पारखी, माधुरी दहिकर, अंजली कुळमेथे, हरबा मोरे, श्रीकांत पतरंगे, अनिल पोहणकर, चंद्रशेखर भडांगे, ऋषी वंजारी (से.नि.), हवालदार डिसेज वालदे (नि.), हवालदार महादेव वासेकर (नि.), हवालदार विनायक गेडाम (नि.), राजू भांडेकर आणि विठ्ठल राऊत (नि.) यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माजी सैनिक डिसेज वालदे यांनी केले.
News - Gadchiroli




Petrol Price




