महत्वाच्या बातम्या

 गोवरी ओपन कास्ट माईन्समध्ये भीषण अपघात : विद्युत खांब कोसळून ठेका कामगार जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) अंतर्गत गोवरी ओपन कास्ट माईन्समध्ये रविवारी ७ जून सकाळी घडलेल्या अपघातात एका ठेका कामगाराला गंभीर दुखापत झाली. १००० वॅट क्षमतेची एलईडी लाईट बसविण्याचे काम सुरू असताना विद्युत खांब अचानक कोसळल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पी.आर. इलेक्ट्रिकल्सचे ठेका कर्मचारी प्रकाश गजानन मोहारे हे सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास विद्युत जोडणीचे काम पूर्ण करून एलईडी लाईट बसविण्यासाठी पुन्हा विद्युत खांबावर चढत होते. यावेळी संबंधित खांब अचानक अस्थिर होऊन कोसळला. खांबासह मोहारे हेही खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी मोहारे यांनी सर्व आवश्यक वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) परिधान केली होती. तसेच ते सेफ्टी बेल्टच्या सहाय्याने सुरक्षित होते. मात्र, संपूर्ण खांबच कोसळल्याने त्यांना दुखापत होण्यापासून बचाव करता आला नाही.

घटनेची माहिती मिळताच वेकोलि व्यवस्थापनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी कर्मचाऱ्याला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्युत खांबाच्या स्थैर्याची तपासणी, देखभाल आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.





  Print






News - Chandrapur




Related Photos