महत्वाच्या बातम्या

 दिवसा ऊन रात्रीला वाढता गारठा : थंडी व दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांना विलंब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शहरात मंगळवारी दिवसा उन्हामुळे ऊबदार वातावरण होते. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गारठ्यापासून नागरिकांची सुटका झाली असली तरी रात्री मात्र पुन्हा थंडीचा कडाका वाढला.

मंगळवारी दिवसाचे तापमान १.१ अंश डिग्रीने वाढून कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने अधिक असल्याने दिवसा गारवा जाणवत नव्हता. मात्र, सूर्यास्तासोबतच थंडीचा प्रभाव जाणवायला लागला. किमान तापमानात ०.७ अंशाची सामान्य वाढ होत तापमान ९.२ अंशावर पोहोचले. मात्र, सरासरीपेक्षा हे तापमान ४ अंशाने कमी असल्याने गारवा जाणवत होता. ८.६ अंश तापमान असलेला गोंदिया जिल्हा विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरला. नागपूरसोबत गडचिरोलीचे तापमान ९.२ अंश सेल्सिअसवर होते. विदर्भात हे दोन्ही जिल्हे गारव्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आगामी २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान वाढण्याची शक्यता आहे.

दाट धुक्याने सर्वत्र चादर पांघरल्यामुळे रेल्वे सेवेवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून थंडीचा पारा घसरतच चालला आहे. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. परिणामी नागपूर मार्गे येणे-जाणे करणाऱ्या तब्बल ३३ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला असून, या गाड्यांपैकी कोणती गाडी, १ तास, कोणती दोन तर कोणती गाडी चक्क सहा तास विलंबाने धावत आहे. रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशात प्रतीक्षालयात जागा कमी पडू लागल्याने अनेक प्रवासी रेल्वेस्थानकाच्या विविध फलाटावर, 

रेल्वेस्थानकाच्या परिसरात जागा मिळेल तेथे दाटीवाटीने बसलेले आढळत आहेत. रेल्वेस्थानकासोबतच रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या प्रवेशद्वार परिसरातही मोठ्या संख्येत प्रवासी दिसून येत आहेत.

विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी रेल्वेस्थानकाच्या आतमधील स्टॉल्स, कॅन्टीन तसेच बाहेर असलेली भोजनालये, हॉटेल्स, चहा टपऱ्यांवरही मोठी गर्दी बघायला मिळत आहे. थंडीचा कडाका असल्याने गरम खाद्यपदार्थ, चहा, कॉफीची मोठी मागणी वाढली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos