महत्वाच्या बातम्या

 भद्रावतीत गवंडी मिस्त्रीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या : जुन्या पैशांच्या वादातून खुनाचा संशय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात बुधवारी सकाळी धारदार शस्त्राने ४० वर्षीय गवंडी मिस्त्रीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. नागमंदिर चौकाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीने जात असलेल्या उमेश भाऊराव मेश्राम यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने मानेवर वार केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले.

मृतक उमेश मेश्राम हे गवंडी मिस्त्री म्हणून काम करीत होते. ते मूळचे देऊरवाडा, ता. भद्रावती येथील रहिवासी असून सध्या शिवाजीनगर परिसरात, प्रज्ञा वाचनालयाजवळ राहत होते. बुधवारी सकाळी ते मोटारसायकलने कामासाठी घराबाहेर पडले होते. नागमंदिर चौकाजवळ पोहोचताच त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने भद्रावती पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच डीवायएसपी सचिन खेत्रे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला.

दरम्यान, जुन्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण, हल्ल्याचे नियोजन आणि घटनेतील इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.





  Print






Related Photos