महत्वाच्या बातम्या

 रेल्वेच्या धडकेत मादा अस्वलाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह - गोंदिया रेल्वेमार्गावर तळोधी वन परिक्षेत्रातील आलेवाही बीटातील कक्ष क्रमांक ९४ मध्ये अज्ञात रेल्वेच्या धडकेत एका पूर्ण विकसित मादा अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अंदाजे सहा ते आठ वर्षे वयाच्या या अस्वलाचा मृतदेह रेल्वे मार्गालगत काम करणाऱ्या मजुरांना आढळून आला. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली.

माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, क्षेत्र सहाय्यक अरविंद माने, वनरक्षक बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वन्यजीव अभ्यासक तथा स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव दल प्रमुख जीवेश सयाम यांच्या उपस्थितीत मृत अस्वलाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सावरगाव येथील वन आगारात नेण्यात आले.

मृत अस्वलाचा शव विच्छेदन डॉ. सतीश तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, नागभीड, डॉ. ईशा आकरे, पशुवैद्यकीय अधिकारी तळोधी आणि डॉ. कुंदन पोचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी टीटीसी चंद्रपूर यांनी केले. अस्वलाच्या बरगड्या तुटलेल्या असून शरीरातील अंतर्गत जखमांवरून रेल्वेच्या जोरदार धडकेमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सावरगाव वन आगार परिसरात मृत अस्वलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बल्लारशाह - गोंदिया रेल्वेमार्ग हा नागझिरा, ताडोबा तसेच ब्रह्मपुरी वन विभागाच्या जंगलातून जात असल्याने या मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरात यापूर्वी सांबर, चितळ, नीलगाय, रानगवे, अस्वल, वाघ आणि बिबट यांसारख्या वन्यजीवांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.

रेल्वेमार्ग जंगलातून जात असल्याने वन्यजीवांच्या हालचालींच्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने वन्यजीवांच्या जीविताला धोका कायम असल्याचा आरोप स्वाब संस्थेने केला आहे.

जंगल परिसरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गालगत जाळीचे कुंपण उभारून वन्यजीवांचा रेल्वे मार्गावर प्रवेश रोखावा, अशी मागणी स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी केली. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनमजूर तसेच स्वाब संस्थेचे पदाधिकारी गणेश गुरनुले, आदित्य नान्हे, शुभम निकेशर आदी उपस्थित होते.





  Print






Related Photos