महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात तीन भीषण रस्ते अपघात : विद्यार्थ्यासह तिघांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात ५ मे रोजी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन भीषण रस्ते अपघातांत एका विद्यार्थ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

पहिली घटना सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास बल्लारशाह–बामनी मार्गावरील रेल्वे लाईन ब्रिजसमोर घडली. विजय राधेकिसन शाहू (वय १९, रा. अष्टभूजा वार्ड, रमाबाईनगर, चंद्रपूर) हा BIT कॉलेज, बामनी येथे परीक्षेसाठी आपल्या मोपेडने (क्रमांक MH ३४ BW ७९०६) जात असताना समोरून येणाऱ्या क्रूझर वाहनाने (क्रमांक MH ३४AM ६६५८) त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात विजय गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी क्रूझर चालकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दुसरी घटना सायंकाळी सुमारे ७ वाजता नागपूर–चंद्रपूर मार्गावर डॉमिनोज पिझ्झा सेंटरसमोर घडली. उमाकांत शामराव वाघमारे (३८, रा. चिंचोली, ता. राजुरा, सध्या मुक्काम साखरी वाघोबा) हे इलेक्ट्रिशियनचे काम आटोपून आपल्या मोटारसायकलने (क्रमांक MH ३४ CB ४२८८) घरी जात होते.

यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचा (क्रमांक MH ३३ AD ६३५१) चालकाने निष्काळजीपणे अचानक दरवाजा उघडल्याने त्यांची दुचाकी त्यावर आपटली आणि ते खाली पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या इंडियन ऑईलच्या टँकरने (क्रमांक MH ४० N ६७४०) त्यांना चिरडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तिसरी घटना रात्री सुमारे १०.४५ वाजता सावरकर चौक परिसरात घडली. प्रदीप राजाराम सिडाम (वय ४०, रा. जलनगर, चंद्रपूर) हे आपल्या मावशीच्या मुलीच्या हळदी समारंभातून (मातोश्री स्कूल मागे) TVS जुपिटर (क्रमांक MH ३४ BW ८४८२) वरून घरी परतत होते.

यावेळी नागपूर रोडकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक MH ३४ BZ ८८५४) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते खाली पडले व ट्रकचे चाक त्यांच्या कंबरेवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.

तिन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos