महत्वाच्या बातम्या

 KBC फेम तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना अटक : २.५७ कोटींचा पूर मदत घोटाळा उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्योपूर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेश पोलिसांनी प्रसिद्ध रिअॅलिटी शो कौन बनेगा करोड़पती मध्ये ५० लाख रुपये जिंकून प्रसिद्ध झालेल्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना अटक केली आहे. त्यांच्यावर २०२१ मध्ये झालेल्या २.५७ कोटी रुपयांच्या पूर मदत घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे.

अमिता तोमर त्या काळी श्योपूर जिल्ह्यातील बडोदा तहसीलात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. २०२१ मध्ये आलेल्या भीषण पूरानंतर ७९४ बाधितांना मदत राशी दिली जाणार होती, परंतु तपासात असे समोर आले की तहसील प्रशासनाने १२७ बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करून सरकारी निधीचा अपहार केला. या खाती बहुतेक तहसील क्षेत्राबाहेरील होती.

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत २२ पटवारी आणि अमिता तोमर यांसह एकूण २३ महसूल अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. एकूण ११० जणांना आरोपी करण्यात आले असून पोलिसांनी भादवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४०९, १२०-बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

नाट्यमय घडामोडीत, अमिता तोमर सध्या विजयपूर येथील तहसीलदार होत्या, परंतु जिल्हाधिकारी अर्पित वर्मा यांनी त्या पदावरून हटवले. त्या अनेक दिवसांपासून ड्युटीवर उपस्थित नव्हत्या. अखेर बडोदा एसडीओपी अवनीत शर्मा यांच्या पथकाने त्यांना ग्वाल्हेर येथील घरातून अटक केली, अशी माहिती श्योपूरचे पोलीस अधीक्षक सुधीर कुमार अग्रवाल यांनी दिली.

अटकेपासून बचाव करण्यासाठी तोमर यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु दोन्ही न्यायालयांनी त्यांचे अपील फेटाळले. अटकेनंतर गुरुवारी तोमर यांना न्यायालयात हजर केले, आणि त्यांची शिवपुरी येथील तुरुंगात रवानगीकरण्यात आली.





  Print






News - World




Related Photos