गो-तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांचा निर्णायक इशारा : २९३ सराईत तस्करांना मकोका कारवाईची तंबी

- अवैध वाहतूक, कत्तल आणि पशुधनावरील क्रूरतेविरुद्ध जिल्हा पोलिसांची कडक मोहीम; मालमत्ता जप्ती व वाहने सरकारजमा करण्याचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील अवैध गो-वंश तस्करी, बेकायदेशीर कत्तल आणि मुक्या जनावरांवरील क्रूरतेच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे जिल्हाभरातील सराईत गो-तस्करांचा विशेष प्रतिबंधक कारवाई कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २९३ सराईत गो-तस्करांना हजर करण्यात आले असून, भविष्यात अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आढळल्यास थेट मकोकासह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कॅम्प पार पडला. यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदे पाटील (आयपीएस), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सदानंद खत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कॅम्पमध्ये उपस्थित सर्व सराईत गुन्हेगारांची सविस्तर माहिती, त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हे, त्यांच्या हालचाली आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची नोंद पोलिसांकडे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा व गडचांदूर उपविभागातील सर्व सराईत गो-तस्कर पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना कठोर शब्दांत समज दिली.
यापुढे अवैध जनावरांची वाहतूक, गो-तस्करी किंवा संघटित स्वरूपातील पशुधनाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी आढळणाऱ्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच अशा गुन्ह्यांतून कमावलेल्या मालमत्तेची चौकशी करून ती जप्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
गो-तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर सरकारजमा करण्यात येतील. अवैध व्यवसायातून आर्थिक फायदा मिळविणाऱ्या व्यक्ती आणि टोळ्यांची आर्थिक साखळी खंडित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, चंद्रपूर जिल्हा पोलीस अवैध गो-तस्करीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आज कॅम्पमध्ये हजर करण्यात आलेले सर्व २९३ सराईत गो-तस्कर पोलिसांच्या सततच्या देखरेखीखाली आहेत. भविष्यात कोणतीही व्यक्ती अशा बेकायदेशीर कृत्यात सहभागी आढळल्यास तिच्यावर थेट कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.
दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गो-तस्करीच्या संघटित जाळ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने ही व्यापक मोहीम हाती घेतली असून, यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे पोलिस प्रशासनाने नमूद केले आहे. जिल्ह्यातील संघटित गो-तस्करीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई मानली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




