कार खरेदीच्या व्यवहारात ३७.७९ लाखांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / ठाणे : कार खरेदीच्या व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. वकिलाकडून ४० लाख ३० हजार २६१ रुपयांना कार खरेदी करण्याचा करार करून केवळ १२ लाख ६१ हजार रुपये अदा करण्यात आले. मात्र उर्वरित ३७ लाख ७९ हजार रुपयांची रक्कम न देता तसेच कारही परत न करता अपहार केल्याप्रकरणी मंगेश लोखंडे याच्याविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वकिलाला त्यांची कार विकायची होती. त्यांच्या ओळखीतील एका गॅरेज चालकाने मंगेश लोखंडे यांचा संदर्भ दिला. त्यानुसार दोघांमध्ये कार विक्रीचा व्यवहार ठरला. करारानुसार ४० लाख ३० हजार २६१ रुपयांत कार विक्री निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, संबंधित कारवर बँकेचे ३९ लाख २९ हजार २६० रुपयांचे कर्ज बाकी होते. या कर्जाचा मासिक हप्ता ९६ हजार ७०० रुपये इतका होता. हा हप्ता नियमितपणे भरण्याची जबाबदारी लोखंडे यांच्यावर देण्यात आली होती. तसेच हप्ते न भरल्यास करारानुसार कार पुन्हा वकिलाला परत करण्याचेही ठरविण्यात आले होते.
मात्र लोखंडे यांनी सुरुवातीला केवळ १२ लाख ६१ हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम न देता कार स्वतःकडेच ठेवली. तसेच कर्जाचे हप्तेही न भरल्याने वकिलाची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी वकिलाने दिलेल्या तक्रारीवरून राबोडी पोलिसांनी मंगेश लोखंडे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Rajy




Petrol Price




