राज्यात खरेच प्लाॅस्टिकबंदी आहे काय?


- सर्रास वापर सुरूच, दंड आकारणेही झाले बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
प्लाॅस्टिकबंदीचा मोठा गाजावाजा करून काही दिवस दंडात्मक कारवाईचा सपाटा लावला होता. मात्र काही कालावधीतच ही कारवाई थांडावली आणि प्लाॅस्टिकचा सर्रास वापर सुरूच आहे. आजही जिकडे तिकडे प्लाॅस्टिक पिशव्या वापरल्या जात असल्याचे दिसून येत आहे, यामुळे राज्यात खरेच प्लाॅस्टिकबंदी आहे काय, असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. 
राज्यात पर्यावरणाला हानिकारक असलेल्या आणि अविघटनशील अशा प्लाॅस्टिकच्या पिशव्या, ताटं, चमचे, टोप्या विकता येणार नाही. विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. तसेच प्लाॅस्टिकची विक्री करणे, वापर करणे गुन्हा आहे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी म्हटले होते. दुकानांमध्ये विक्रीसाठी येणार्या शेकडो वस्तूंचे आवरण प्लाॅस्टिकचे असतात. तसेच दुधासारख्या पदार्थासाठी जाड प्लाॅस्टिकचा वापर केला जातो. यामुळे या प्लाॅस्टिक वापरून इतरत्र टाकल्या जातेच. केवळ बाजारात किरकोळ सामान विक्रेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या प्लाॅस्टिक पिशव्यांवरच बंदी लादून काही उपयोग नाही. तसेच सध्या कार्यक्रम, पार्ट्या आदींमध्ये पत्रावळी, ग्लाॅस, कप आदी प्लाॅस्टिकपासून तयार केलेल्याच वापरल्या जात आहेत. बंदीनंतरही या वस्तू सर्रास वापरात आणल्या जात आहेत. मात्र आता कारवाई थंडबस्त्यात आहे.
आज बाजारात भाजीपाला किंवा इतर वस्तू खरेदी करावयास गेल्यास प्लाॅस्टिक पिशव्या सहज मिळताना दिसून येत आहेत. बंदीच्या घोषणेनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात ओरड झाली होती. प्लाॅस्टिक उत्पादक कंपन्यांकडून वारंवार चर्चा करून प्लाॅस्टिकच्या उत्पादनाबाबत निकष बदलविण्यात येत होते. लाखो लोकांचा रोजगार हिरावल्या गेल्याचेही बोलल्या गेले. काही दिवस शासकीय यंत्रणांनी मोहिम राबवून गोदामांवर तसेच दुकानांमध्ये धाडी टाकून दंडही वसूल केला. मात्र आता ही कारवाईच थंडबस्त्यात असून प्लाॅस्टिक पिशव्या आणि प्लाॅस्टिकपासून तयार झालेल्या वस्तू अगदी सहजरित्या मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सरकार घोषणा करते पण हवेतच विरते, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-23


Related Photos