गोंडवाना सैनिकी विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय येथे राजभाषा मराठी दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या फन अँड फूड हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा विद्यालयातील चार हाउसेसमध्ये घेण्यात आली.
स्पर्धेमध्ये अचूक व तत्पर उत्तरे देत २०० पैकी १७० गुण मिळवत चंद्रशेखर आझाद हाउसने प्रथम क्रमांक पटकाविला. या हाउसमधील आकाश टेकाम, अनुज कुथे, अमरजीत मित्रा, विभास खेवले व प्रीत कांबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
तसेच वीर सावरकर हाउसने १३५ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. या हाउसमधील नमन जुलावी, ताराम घुबडे, मयूर फुलकावर, यथार्थ गिरडकर व गौरव गोहाने यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला.
स्पर्धेत जिल्हा पातळी, राज्य पातळी, क्रीडा क्षेत्र, चालू घडामोडी, ऑडिओ-व्हिज्युअल, मराठी ज्ञान, भारताचा इतिहास तसेच रॅपिड फायर अशा एकूण नऊ फेऱ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे व इतर मान्यवरांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर व सी. वी. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व मराठी व विज्ञान शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्राचार्य संग्रामे यांनी कणा या कवितेचा मार्मिक अर्थ स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच पर्यवेक्षक वानखेडे, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार व शिक्षक देवेंद्र म्हशाखेत्री यांनी स्कॅटरिंग ऑफ लाईट या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेअंती विजेत्या गटाला ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त गटाचाही प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
संपूर्ण स्पर्धेचे क्विझ मास्टर म्हणून नरेंद्र उंदिरवाडे, रमण गागापुरवार व संतोष बोबाटे यांनी जबाबदारी पार पाडली, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेमसुधा मडावी यांनी प्रभावीपणे केले.
सदर प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची आवड वाढीस लागून स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
News - Gadchiroli




Petrol Price




