दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर


- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदाच्या वर्षी १२ वीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होईल तर २१ मे रोजी १२ वीचा शेवटचा पेपर असेल, तर १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. १० वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि १२ वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
मागच्यावर्षी कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती, त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोके वर काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर झाला नव्हता, अखेर राज्य सरकारने हा पेपर रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा केली होती. दरम्यान कोरोनामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा जानेवारी महिन्याच्या अखेर सुरू करणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. पण चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.
कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
  Print


News - Rajy | Posted : 2021-01-21


Related Photos