महत्वाच्या बातम्या

 अमरावतीत जिनिंगला भीषण आग : हजारो क्विंटल कापूस जळून खाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : अमरावती येथील अकोला मार्गावरील नंदू सोमानी यांच्या जिनिंगमध्ये सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुमारे तीन तासांचा कालावधी लागला असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दर्यापूर-अकोला मार्गावरील या जिनिंगमध्ये रविवारी सकाळी मशीनमधील पात्यातून उडालेल्या ठिणगीतून प्रथम टाकाऊ म्हणून गोळा करून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला आग लागली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाची असलेली आग काही वेळातच भडकली आणि साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यांनी आगीचे रौद्र रूप धारण केले. कापूस अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने वेगाने संपूर्ण परिसर व्यापला.

घटनास्थळी उपस्थित मजुरांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याने प्रयत्न अपुरे ठरत होते. परिस्थिती गंभीर होताच दर्यापूर येथील अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

दरम्यान, अंजनगाव, अकोट, मूर्तिजापूर आणि अचलपूर येथूनही अग्निशमन दलाचे बंब मदतीसाठी दाखल झाले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.

या जिनिंगमध्ये भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) कापूसही साठवलेला होता. सुदैवाने संबंधित गंजी आगीपासून वाचविण्यात यश आल्याचे सांगण्यात आले. तसेच जिनिंगमधील मजूर, मालक आणि परिसरातील इतर जिनिंगवरील मालक व कामगार यांनीही आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

विशेष म्हणजे, सोमानी जिनिंगला यापूर्वीही आग लागून मोठे नुकसान झाले असल्याची नोंद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण आणि एकूण नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.





  Print






News - World




Related Photos