महत्वाच्या बातम्या

 बल्लारशाह-मुंबई नवीन रेल्वे सेवा सुरू होणार : आ. सुधीर मुनगंटीवार यांचे सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेस या नव्या रेल्वे सेवेच्या संचालनास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी १० मे २०२६ रोजी पत्राद्वारे नवीन २०१०५/२०१०६ लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेस सुरू करण्यास मान्यता दिल्याची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडे प्रवास करण्यासाठी मोठी सुविधा मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने वाढता प्रवासभार लक्षात घेता, अतिरिक्त रेल्वे सेवेची गरज आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने मांडली होती. त्याच्या सकारात्मक प्रतिसादाद्वारे रेल्वे मंत्रालयाने नव्या एक्सप्रेसच्या संचालनास मंजुरी दिली.

सध्या सुरू होणाऱ्या या नव्या रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारपूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबईकडे प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. व्यापारी, विद्यार्थी, कामगार तसेच भाविकांनाही या सेवेचा मोठा लाभ मिळणार असल्याचे मानले जात आहे. जिल्हाभरातून या निर्णयावर समाधान व्यक्त केले जात आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी रेल्वेसंबंधी प्रश्नांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार आहे. तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार त्यांनी मानले आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos