मार्कंडा यात्रेत नदीपात्रात बुडणाऱ्या चौघांचे थरारक बचावकार्य


- आपदा मित्र, एसडीआरएफ व पोलिस पथकाची सतर्कता; मोठी दुर्घटना टळली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मार्कंडा यात्रेदरम्यान नदीपात्रात स्नान करताना खोल पाण्यात वाहून गेलेल्या चौघा युवकांचे वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे प्राण वाचले. आपदा मित्र, एसडीआरएफ व पोलिस बचाव पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
पहिली घटना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. मार्कंडा यात्रा येथे स्नान करत असताना कु. ओम बोरुले (रा. सावली) हे अचानक खोल पाण्यात वाहून गेले. नदीपात्रात बुडत असल्याचे लक्षात येताच आपदा मित्र मनोज आत्राम व एसडीआरएफ पथकातील सपोशी गणेश सांगळे यांनी तत्काळ पाण्यात उडी घेऊन युवकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे अनर्थ टळला.
दुसरी घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. सुमित शेंडे (वय १६), समीर शेंडे (२२) व आकाश शेंडे ( २८, रा. मुल, जि. चंद्रपूर) हे स्नान करत असताना खोल पाण्यात अडकले. तिघेही बुडत असल्याचे दिसताच आपदा मित्र समीर शेंडे, अनिकेत खोब्रागडे, मनोज आत्राम तसेच पोलिस बचाव पथकातील वासनिक व पोशी रुपेश यांनी तत्परतेने बचावकार्य हाती घेतले. संयुक्त प्रयत्नातून तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या दोन्ही घटनांमुळे यात्रेकरूंमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बचाव पथकाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली. प्रशासनाने यात्रेकरूंनी नदीपात्रात स्नान करताना खोल पाण्यात जाणे टाळावे, तसेच सुरक्षा सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




