आरमोरीतील डांबर प्लॉटला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध : आमरण उपोषणाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी शहरापासून काही अंतरावर ठाणेगाव परिसरात सुरू करण्यात येणाऱ्या डांबर प्लॉटला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आरमोरी-डोंगरी बायपास रोडवरील सहारे पेट्रोलपंपाच्या मागील भागात सर्व्हे क्रमांक १२८/२ मधील शेतशिवरात डांबर प्लॉट उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्लॉटला परवानगी दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी नायब तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार संबंधित शेती ही उदयकुमार नरेंद्रसिंग प्रमर, अंशुक उदयकुमार प्रमर व आदित्य ओमेंद्रसिंग प्रमर यांच्या मालकीची आहे. या ठिकाणी जून २०२३ मध्ये डांबर प्लॉटचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी प्रदूषण व शेतीच्या नुकसानाच्या भीतीने त्यास विरोध करत तत्कालीन तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पत्रव्यवहार झाल्यानंतर हे काम बंद करण्यात आले होते.
परंतु तीन वर्षांनंतर पुन्हा ३० जानेवारी २०२६ पासून या डांबर प्लॉटच्या बांधकामाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. फॅक्टरीसाठी लागणाऱ्या मशीनसुद्धा आणून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच शेतकरी एकत्र आले.
तात्काळ बांधकाम बंद करण्याची मागणी -
सर्व शेतकऱ्यांनी आरमोरी येथील नायब तहसीलदार लाडे यांना निवेदन देत डांबर प्लॉटचे काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली. तसेच आरमोरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनाही निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
प्रदूषणामुळे शेती व आरोग्याला धोका -
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा परिसर वडिलोपार्जित शेतीचा असून अनेकांचे उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. या भागात बारमाही भाजीपाला व बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. डांबर प्लॉट सुरू झाल्यास फॅक्टरीमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो.
याशिवाय प्लॉटच्या जवळच पेट्रोलपंप असल्याने या परिसरात सतत नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी डांबर प्लॉट उभारणे धोकादायक ठरू शकते, असा आक्षेपही शेतकऱ्यांनी नोंदविला आहे.
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित -
निवेदन देताना आरमोरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, उपाध्यक्ष विलास पारधी, नगरसेवक अक्षय हेमके यांच्यासह शेतकरी अनिल नैताम, मिथुन मडावी, भोजराज निंबेकर, मनोज बोरकर, स्वप्नील धात्रक, जितेंद्र सोनटक्के, राजु सोनटक्के, राजु घटुरकर, तुळशीदास नन्नावरे, हिवराज बोरकर, पवन निंबेकर आदींसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून डांबर प्लॉटच्या बांधकामास स्थगिती द्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




