महत्वाच्या बातम्या

 गुंजखेडा घाटात वाळू उपसत असताना मजुराचा मृत्यू : पोलिसांत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : गुंजखेडा घाट परिसरातील बिडवाले मारोती मंदिराजवळ वाळू उपसत असताना पद्मशेष गोमाजी चवरके (वय ३६, रा. गुंजखेडा) याचा मृत्यू झाला, असे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. ही घटना १८ जानेवारी रोजी घडली होती. चौकशी अहवालानुसार, कामावर असलेल्या मजुरांना कोणतेही सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले गेले नव्हते, ज्यामुळे पद्मशेष चवरके वर्धा नदीपात्रात बुडून मृत्यूमुखी पडले.

या घटनेनंतर पुलगाव पोलिसांत अखिल खान, सुनील बावणे (दोन्ही रा. गुंजखेडा) आणि अमोल फुंडे (रा. दखनी फैल, पुलगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी अहवालातून असेही स्पष्ट झाले आहे की, गुंजखेडा परिसरात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे आणि कामगारांची सुरक्षा दुर्लक्षित केली जात आहे.

पोलिस हे प्रकरण सखोल तपासत असून, संबंधित आरोपींविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याची तयारी करत आहेत. स्थानिक प्रशासनाने देखील मजुरांच्या सुरक्षेसाठी आणि अवैध वाळू उपसावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, मजुरांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.





  Print






News - Wardha




Related Photos