महत्वाच्या बातम्या

 सातवीतील विद्यार्थिनीला बेदम मारहाण : शिक्षिका व मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिका व शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संघर्षनगर येथील राज गवई पब्लिक स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण कक्षाअंतर्गत येणाऱ्या चाईल्ड हेल्पलाईन योजनेतील समुपदेशक मंगला टेंभुर्णे यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २२ जानेवारी रोजी सातवीतील एका विद्यार्थिनीने वर्गात बसलेल्या तिच्या मैत्रिणीकडे आरसा मागितला. या क्षुल्लक कारणावरून शिक्षिका तसलीम हिने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली.

त्यानंतर शिक्षिकेने संबंधित दोन्ही विद्यार्थिनींना वर्गखोलीच्या बाहेर उभे राहण्याची शिक्षा दिली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका नसरीन अख्तर यांनी विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. तू आमचे ऐकत नाहीस, असे म्हणत त्यांनी लोखंडी पट्टीने विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसला असून, मारहाणीमुळे तिला शारीरिक जखमाही झाल्या आहेत. घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

त्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन संबंधित शिक्षिका व मुख्याध्यापिकेविरोधात जाब विचारला व कारवाईची मागणी केली. मात्र, शाळा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. अखेर पालकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत यशोधरानगर पोलीस ठाण्यात शिक्षिका व मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २६ जानेवारी रोजी पोलिसांनी मेयो रुग्णालयात विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केली असून, २७ जानेवारी रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालकांसह विविध संघटनांकडून केली जात आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos