महत्वाच्या बातम्या

 ड्राय डेच्या दिवशी बल्लारपूर पोलिसांची कारवाई : दोघांकडून दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ड्राय डेच्या दिवशी अवैधरित्या दारूची साठवणूक करून विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून बल्लारपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत शंकर मधुकर कामटकर ३५ वर्ष , रा. श्रीराम चौक, विसापूर आणि राजेश मैकुलाल बहुरिया ४८ वर्ष , रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर यांच्याकडून एकूण २ हजार ६२० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली.

पहिल्या कारवाईत विसापूर येथील श्रीराम चौक परिसरात राहणारा शंकर मधुकर कामटकर हा आपल्या घरी देशी दारू बाळगून अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी घराच्या व्हरांड्यात जिन्याखाली काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत रॉकेट संत्रा कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या २० सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

दुसऱ्या कारवाईत सरदार पटेल वार्डातील राजेश मैकुलाल बहुरिया याच्या घरी विदेशी दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घराची झडती घेतली असता, घराच्या दरवाज्याजवळील पायरीवर ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या ९० मिली क्षमतेच्या १३ सीलबंद बाटल्या आढळल्या. या दारूची किंमत १ हजार ८२० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दारू विक्रीचा परवाना नसल्याने पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.

संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड आणि पोलीस अंमलदारानी केले.





  Print






Related Photos