महत्वाच्या बातम्या

 वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : ध्येय वेडेच इतिहास घडवतात, वडात मराठे वीर दौडले सात या आगामी चित्रपटात ध्येय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहे, त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन कलाकारांच्या पाठीशी असून उत्तन जवळ नवीन चित्रनगरी बनविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.
शिवाजी महाराजांनी गड - किल्ल्यांची केलेली बांधणी, उंचावरील तोफा, गडावरील पाणीसाठा हे काम दूरदृष्टीचे होते. हे वैभव पाहून रयतेचा राजा नजरेसमोर येतो. त्यांच्यावरील सर्वच चित्रपटांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला देखील रसिकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट कात टाकतोय असे सांगून हा चित्रपट देखील भव्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिवाजी पाटील यांची भूमिका साकारणारे विराज मडके, तुळजा जामकर यांची भूमिका साकारणारे जय बुधाने, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणारे प्रवीण तरडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली. या चित्रपटात शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहेत.
डिसेंबर मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून सन २०२३ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





  Print






News - Rajy




Related Photos