महत्वाच्या बातम्या

 हलबीटोला–सावरी शेतशिवारात युवकाची आत्महत्या : परिसरात हळहळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम हलबीटोला–सावरी येथील शेतशिवारात एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (१०) दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत युवकाचे नाव शिवदास रतीराम कवास (वय ४५, रा. हलबीटोला) असे आहे.

याबाबत फिर्यादी गिरधारी मोहन कवास (वय ३५, रा. हलबीटोला–सावरी) यांनी रावणवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (९) दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान शिवदास कवास हे दारूच्या नशेत घरातून शेताकडे गेले होते. मात्र, सायंकाळ झाली तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान, त्यांचा मुलगा रोहित वडिलांचा शोध घेण्यासाठी शेतात गेला असता त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. शनिवारी (१०) दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा शोध घेत असताना शेतातील धुराच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोराच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत शिवदास कवास यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच रावणवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंकज सव्वालाखे करीत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos