महत्वाच्या बातम्या

 जादा दराने खत विक्री आढळल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके योग्य दरात आणि सहज उपलब्ध व्हावीत तसेच त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावी, खरेदीची पावती घ्यावी आणि उत्पादनांची वैधता तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

काही ठिकाणी रासायनिक खतांची विक्री कमाल किरकोळ विक्री किमतीपेक्षा (एमआरपी) जादा दराने होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बनावट अथवा संशयास्पद खतांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत, दर्जाबाबत किंवा इतर कोणत्याही तक्रारी असल्यास संबंधित कृषी कार्यालयात तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे.

राज्य, विभाग व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यरत -
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी कृषी विभागाने राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. शेतकऱ्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे:
- राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष (टोल फ्री) : १८००२३३४०००
- विभागस्तरीय नियंत्रण कक्ष : ९३७३८२११७४
- जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष : ९४२३०२८३७२
या नियंत्रण कक्षांवर प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना -
बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी खरेदीची पक्की पावती, उत्पादनाचे लेबल व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कागदपत्रे भविष्यात तक्रार निवारणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात.

अधिक माहितीसाठी संपर्क -
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य दरात व दर्जेदार कृषी निविष्ठा मिळाव्यात आणि कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतत दक्ष असल्याचे या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos