महत्वाच्या बातम्या

 शेती सीमावादातून शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचा हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कमरगाव येथे शेतीच्या सीमारेषेच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (२) घडली. या घटनेत शालिकराम चैतराम रहांगडाले (५७, रा. कमरगाव) हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शालिकराम रहांगडाले हे आपल्या शेतात काम पाहत असताना आरोपी लक्ष्मण चैतराम रहांगडाले व नीलेश लक्ष्मण रहांगडाले यांनी आमच्या धुऱ्यावर जेसीबी का चालविली तसेच आमच्या शेतासमोरील पाट कशासाठी काढली, ही जागा आमच्या मालकीची असल्याचा दावा करीत त्यांच्याशी वाद घातला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ केल्यानंतर वाद अधिक चिघळला.

याच वादातून आरोपी नीलेश रहांगडाले याने आपल्या जवळील कुऱ्हाड शालिकराम यांच्याकडे फेकून मारली. ही कुऱ्हाड शालिकराम यांच्या मानेच्या उजव्या बाजूस लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेनंतर जखमी शालिकराम रहांगडाले यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, गोरेगाव येथे उपचार करण्यात आले. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos