शेतपिक व फळपिकांच्या नुकसानीचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात


- शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : खरीप २०२५ जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील एकूण १ लाख १२ हजार ९१४ शेतकऱ्यांचे ९२८१७.३९ हे. आर शेतपिकांचे व फळपिकांचे व जमिनीचे नुकसान झाले. या अनुषंगाने एकूण ११९.५४ कोटी रुपयांच्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात आली होती. यापैकी जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या नुकसानाची मदत रक्कम ४.८९ कोटी रुपये प्राप्त झाले. शासन स्तरावरून हा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वितरीत करण्यात आला आहे.
माहे सप्टेंबर-२०२५ या कालावधीतील ८७१६९.३८ हे. आर क्षेत्रावरील १ लाख ३ हजार ८७१ शेतकऱ्यांच्या ११४.६४ कोटी रुपये इतका निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. यातील १००.७७ कोटी रक्कम (८७.९०%) वाटप करण्यात आलेली असून शिल्लक वाटपाची कार्यवाही सुरु आहे.
काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे तसेच अँग्रीस्टकमध्ये नोंदणी न केल्यामुळे वाटपासाठी अडचण निर्माण होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पावेतो अँग्रीस्टॅक मध्ये नोंदणी केलेली नाही त्यांनी आपली नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे खात्यात अद्यापपावेतो शेत पिकाचे नुकसानीबाबत निधी जमा झाला नाही, त्यांनी आपले जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केले आहे. जेणेकरून आपल्या खात्यात निधीची रक्कम जमा होण्यास अडचण निर्माण होणार नाही, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
News - Nagpur




Petrol Price




